नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. हे निवडणूक चिन्ह घेऊन लोकसभेसाठी पक्षाचा आणि पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करू, असे राशपच्या नेत्यांनी सांगितले. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात फूट पडली. मतभेद वाढल्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. आयोगाने बहुसंख्य खासदार आणि आमदार अजित पवारांसोबत असल्याचे निरीक्षण नोंदवत अजित पवारांकडे आहे तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे निर्णय दिला. यानंतर पवारांसोबत असलेल्यांना स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता देण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरू केली. आयोगाने पवारांच्या नेतृत्वातील गटाला राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष अर्थात राशप असे नाव दिले. यानंतर राशपला आयोगाने तुतारी हे निवडणूक चिन्ह दिले. निवडणूक आयोगाने नियमानुसार निर्णय दिला आहे. पण राशपची तुतारी वाजणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्या राजकीय विरोधकांनी दिली.