कल्याण, २० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कल्याण पूर्वेतील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या तिसाई चौक परिसरातील जरीमरी व्हिजन या कार्यालयाची चार ते पाच जणांनी तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्यांनी अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तोडफोड प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. याआधी द्वारली येथील जागेच्या वादातून हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या कक्षात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड आणि इतर चार अशा एकूण पाच जणांना अटक केली. या आरोपींना आधी चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. यानंतर आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली.