बीड, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटी या गावात बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. या उपोषणात मनोज जरांगे यांनी अन्न पाणी घेण्यास नकार दिला आहे. इतकंच नाही, तर मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यासही नकार दिल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आरोग्य सेवा वगळता सर्व कारभार मराठा आंदोलकांनी बंद पाडला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी बीडमध्ये २७ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. जरांगेंच्या सर्व मागण्या ताबडतोब मान्य करा आणि अंमलात आणा अशी मागणी मराठा आंदोलक करत आहेत. मागण्या मान्य करा नाही तर परिणाम भोगा असा इशारा आंदोलकांनी राज्य शासनाला दिला आहे.
येवल्यात बंद
मनोज जरांगे हे परत एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला समर्थन देत येवल्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने येवला बंदची हाक दिली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं बघण्यास मिळत आहे. काही दुकानं सुरू आहेत तर काही बंद असल्याचं चित्र येवला शहरात दिसतंय.
छत्रपती संभाजीनगर जिल्हयात बंद
छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सोयगाव शहर, छत्रपती संभाजीनगर तालुका, वैजापूर तालुक्यात महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. हा बंद शांततेत पाळण्यात यावा असे आवाहन सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आले आहे.
बारामतीत बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा
मराठ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी बारामतीत व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली. दुपारी बारा पर्यंत बारामतीत बंद पाळण्यात आला.