मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : आमदारकीचा आणि काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी भाजपाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. पक्षात प्रवेश करताना अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना हस्तांदोलन केले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माईकवरून अशोक चव्हाणांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरला. त्यावर स्वाक्षरी केली आणि तो अर्ज बावनकुळे यांच्या हाती सोपवला. त्यासोबतच सदस्य नोंदणी फी म्हणून त्यांनी ३०० रुपये बावनकुळे यांच्याकडे दिले. ‘घ्या…. ही पक्षाची फी घ्या..’ असं अशोक चव्हाण म्हणाले. त्यावर बावनकुळे आणि फडणवीस यांनीही स्मितहास्य करत प्राथमिक सदस्यत्वाचे शुल्क स्वीकारले. नंतर अशोक चव्हाण यांच्या गळ्यात भाजपाचं उपरणं घालून आणि पुष्चगुच्छ देऊन फडणवीस – बावनकुळेंनी त्यांचं अधिकृतरित्या पक्षात स्वागत केलं. आतापासून भाजपाचा नेता म्हणून पक्ष वाढीसाठी मी काम करेन, अशी ग्वाही चव्हाण यांनी सगळ्यांसमोर दिली.