मुंबई, ०९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : अभिषेक घोसाळकर यांच्याबाबत घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. एका तरुण नेत्याचे अशा पद्धतीने निधन व्हावे, हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, तेदेखील योग्य नाही. ही घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडलेली आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, तर विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत असून, विरोधक हे विरोधी पक्षाचे काम करत असल्याचा टोला या वेळी त्यांनी लगावला आहे.
दहिसरमध्ये ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री हत्या झाली. फेसबुक लाइव्ह करणाऱ्या मॉरिस नावाच्या व्यक्तीने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. तसेच मॉरिसने स्वत:ला ४ गोळ्या झाडात आत्महत्या केली. या प्रकरणावरून विरोधकांनी गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली. या वेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. त्यावर शुक्रवारी फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली.
घोसाळकरांच्या मृत्यूचे विरोधकांकडून राजकारण
राज्याचे गृहमंत्री हे सक्षम नाहीत. त्यांनी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्री आणि गुंडांचे संबंध उघड होत आहेत, असे आरोप आता विरोधी पक्षांतून होताना दिसत आहेत.
गृहमंत्री फडणवीस म्हणाले की,
गुरुवारी रात्री अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, ही घटना अत्यंत दुख:द आहे. एका तरुण नेत्याचे अशा पद्धतीने निधन व्हावे हे अतिशय गंभीर आहे, पण या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. तेदेखील योग्य नाही. ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस आणि घोसाळकर यांची एकत्रित पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळाली आहेत. वर्षानुवर्षे ते एकत्र काम करत असताना पाहावयास मिळाले आहेत. आत कुठल्या विषयातून त्यांच्यात इतका बेबनाव झाला, की या मॉरिसने थेट घोसाळकर यांना गोळ्या मारल्या आणि स्वत:लाही गोळ्या मारून घेतल्या. हा निश्चितपणे महत्त्वाचा विषय आहे. याची चौकशी सुरू आहे. बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आल्या आहेत. त्या योग्यवेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील. याची कारणे लक्षात येत आहेत.
हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत. आता आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशीच आहे. ही तर घटना गंभीर आहे, पण एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. त्यांनी गंभीर घटनेकरिता राजीनामा मागितला तर त्यात काही आश्चर्य वाटत नाही. मला असं वाटतं की, या सगळ्या गोष्टीचं राजकारण ते करू पाहताहेत. त्यांनाही माहिती आहे ही, जी हत्या झाली आहे ती वैयक्तिक वैमनस्यातून झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करतोय, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.