धुळे, ५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांड प्रकरणाचा सोमवारी धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने २८ संशयितांपैकी ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या गावामध्ये भीक्षा मागणाऱ्या गोसावी समाजाच्या पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या सामूहिक हत्याकांड प्रकरणांत धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने सात जणांना जन्मठेपेचे शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात इतर २१ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्ता करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निकाल ही न्यायालयाने दिलेला आहे. दोषी ठरलेल्या ७ जणांपैकी एक फरार आहे. या आरोपीला शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
राईनपाडा हत्याकांड
महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे १ जुलै २०१८ रोजी मुलांचे अपहरण करणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमावाने पाच जणांची हत्या केली होती. नाथ गोसावी भिक्षुकांची क्रूर हत्या झाली होती. हे भिक्षुक मंगळवेढा तालुक्यातून आले होते. या हत्याकांड प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांनी या खटल्याचे कामकाज पहिले. तत्कालीन पोलीस उप अधीक्षक श्रीकांत घुमरे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला.