अयोध्या, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी झाली आणि मंगळवार २३ जानेवारी २०२४ पासून राम मंदिर सर्वांसाठी खुले झाले. दर्शन खुले झाल्यापासून दररोज राम मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. या भाविकांकडून मंदिराला मोठ्या प्रमाणात दान दिले जात आहे. दानाची नेमकी रक्कम किती यावरून चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी माहिती दिली आहे.
मंदिरात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी म्हणजे सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी दान काउंटरवर सहा लाख रुपयांचे रोख दान मिळाले. तर ड्राफ्ट आणि चेकद्वारे दिवसभरात तीन कोटी रुपये मिळाले. यानंतर मंगळवार २३ जानेवारी २०२४ रोजी २७ लाख रुपये रोख मिळाले. तर बुधवार २४ जानेवारी २०२४ रोजी १६ राख रुपये दान मिळाले.
‘राम मंदिरात बॉक्समध्ये पैसे घेतले जात नाहीत. काउंटरवर दान घेतले जाते आणि त्याची लगेच पावती दिली जाते. दानपात्राशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी मंदिरात पैसे स्वीकारले जात नाहीत. तसेच दान करण्यासाठी सांगितले जात नाही. भाविक त्यांची इच्छा असेल तर दान करतात. दान स्वच्छेने केले जाते. दानपात्रातील पैसे स्टेट बँकेच्या सुरक्षेत असतात. तेच दानपात्र घेऊन जातात आणि त्याची मोजणी करतात. बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याची मोजणी होते आणि आमचे कर्मचारी निरीक्षक म्हणून तिथे उपस्थित असतात. गुप्त पद्धतीने पैसे घेतले जात नाहीत आणि घेतले जाणार नाहीत’; असे राम मंदिराचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले.
‘भाविकांकडून राम मंदिरात केल्या जाणाऱ्या दानाचा हिशोब ठेवला जातो. जुन्या मंदिराच्या दानपात्रात आलेल्या पैशाचा पण हिशोब ठेवला आहे’; असे राम मंदिराचे प्रभारी प्रकाश गुप्ता म्हणाले.