नवी दिल्ली, २२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भाजपाने ‘स्वप्न… विश्वास… साध्य’ असे लिहून एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमुळे लवकरच होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा राम मंदिर हा मुद्दा राजकीय लाभासाठी वापरणार असल्याची चर्चा आहे.
भाजपाने केलेल्या ट्वीटमध्ये ‘मंदिर यहीं बनायेंग’ असे एका ठिकाणी लिहिलेले आढळते. या छायाचित्राला भाजपाने ‘स्वप्न’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध केले आहे. तर ‘विश्वास’ या शिर्षकाखाली रथयात्रेतील छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या छायाचित्रात मध्यभागी लालकृष्ण अडवाणी आणि एका बाजूस नरेंद्र मोदी दिसत आहेत. भाजपाने ‘साध्य’ या शिर्षकाखाली राम मंदिराचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.
पक्ष स्थापनेपासूनच भाजपाने कायम त्यांच्या मुख्य राजकीय कार्यक्रमात राम मंदिर हा मुद्दा ठेवला होता. जेव्हा बहुमत नव्हते त्यावेळी भाजपाने हा मुद्दा तात्पुरता मागे ठेवला पण रद्द केला नव्हता. जेव्हा बहुमत येईल त्यावेळी हा मुद्दा पुन्हा विचारात घेऊ अशी स्पष्ट भूमिका भाजपाने घेतली होती. मोदी सरकारने स्पष्ट बहुमत असताना राम मंदिराचे आश्वासन पूर्ण केले. हेच सांगत भाजपाने ‘स्वप्न… विश्वास… साध्य’ असे ट्वीट केले.