अयोध्या, २० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेला ४८ तासांपेक्षा कमी कालावधी उरला असताना अयोध्येतून एक महत्त्वाची बातमी आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने अर्थात यूपी एटीएसने खलिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून तीन तरुणांना अटक केली आहे. अटक केलेल्या तीन जणांपैकी दोन जण राजस्थानमधील सीकर भागातील रहिवासी आहेत. या घटनेनंतर अयोध्येतील तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ड्रोनद्वारे अयोध्येची सतत हवाई पाहणी सुरू आहे. महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब आणि सुरुंग शोधणारी आधुनिक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. निवडक ठिकाणी जॅमर बसवून मोबाईलचे सिग्नल जॅम करण्यात आले आहेत.