मुंबई, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभाध्यक्षांनीही उद्धव गटाच्या विरोधात निकाल देत एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. या निकालाविरोधात उद्धव गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. यासाठी उद्धव गटाचे पदाधिकारी आणि वकील यांचे पथक दिल्लीला रवाना झाले आहेत. निवडणूक आयोगाकडे शिवसेना या पक्षाची १९९९ ची घटना आहे. यानंतर घटनेत बदल झाले असतील तर त्याची नोंद पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली नाही. यामुळे आधी निवडणूक आयोगाने नंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना या पक्षाची १९९९ ची घटना ग्राह्य धरून निकाल दिला.
उद्धव गटाचे निवडणूक चिन्ह संकटात ?
उद्धव गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. पण या निर्णयाला समता पक्षाकडून आव्हान दिले जाणार असल्याचे समजते. प्रामुख्याने बिहारमध्ये सक्रीय असलेल्या समता पक्ष या प्रादेशिक पक्षाला तिथे निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. राष्ट्रीय पातळीवर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मशाल हे निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी समता पक्षाकडून प्रयत्न सुरू आहे. याआधीही एकदा निवडणूक आयोगाने उद्धव गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह दिल्यावर समता पक्षाने आयोगाकडे दाद मागितली होती. पण त्यावेळी आयोगाने त्यांची याचिका फेटाळली होती. आता पुन्हा अपिलात जाण्याचा विचार समता पक्ष करत असल्याचे समजते.