केपटाऊन, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : दक्षिण आफ्रिकेचा घरच्या मैदानावर दीड दिवसांत पराभव झाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लहान सामना ठरला. या सामन्यात ६४२ चेंडू टाकले गेले. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने भारतातील खेळपट्ट्यांवर टीका करणाऱ्यांना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला. यानंतर आयसीसीने केपटाऊन कसोटीची गंभीर दखल घेतली आहे. सामनाधिकारी क्रिस ब्रॉड यांनी त्यांचा अहवास सादर केला आहे. चेंडू अनेकदा वेगाने आणि धोकादायक पद्धतीने उसळी घेत होता असे अहवालात नमूद आहे. यानंतर आयसीसी खेळपट्टी आणि मेदान समितीने केपटाऊनमधील न्यूलँड्सच्या खेळपट्टीला एक डीमेरिट गुण दिला. एखाद्या खेळपट्टीला सहा डीमेरिट गुण मिळाले तर त्या खेळपट्टीवर पुढील बारा महिने एकही आंतरराष्ट्रीय सामना होत नाही. एखाद्या खेळपट्टीला बारा डीमेरिट गुण मिळाले तर त्या खेळपट्टीवर पुढील चोवीस महिने एकही आंतरराष्ट्रीय सामना होत नाही. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाकडे आयसीसीच्या डीमेरिट गुणाच्या निर्णयाविरोधात अपिलात जाण्यासाठी चौदा दिवसांची मुदत आहे.