मुंबई, ८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण महाविकास आघाडीत जागा वाटपावरून मतभेद वाढू लागले आहेत. लोकसभेसाठी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाचे मनोज कोटक ईशान्य मुंबईतून खासदार झाले. आता या जागेवर उद्धव गट आणि काँग्रेस या दोघांकडून दावा करायला सुरुवात झाली आहे. ही जागा आधीपासूनच आमची होती. मोदी लाटेमुळे दोन वेळा भाजपाचा विजय झाला. पण आधी ईशान्य मुंबईत काँग्रेस किंवा काँग्रेस समर्थित उमेदवार विजयी झाला आहे, असे सांगत काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे.