मुंबई, २ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी युवा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला मिळाली आहे. त्यामुळे नाशिक येथे दिनांक १२ ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ होणार आहे. त्यामध्ये देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांच्यातील युवांचे चमू सहभागी होणार आहेत.
या महोत्सवात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यातील प्रत्येकी १०० युवांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे ८ हजार जण यात सहभागी होणार आहेत. महोत्सवाचे १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नाशिक येथील तपोवन मैदानावर उद्घाटन समारंभ होणार आहे. महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समुह लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने यांचा समावेश असणार आहे.