मुंबई, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी आता शिक्षक मिळणार आहेत. महाराष्ट्रातील १४१ खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमाशाळांसाठी २८२ शिक्षकांच्या पदांना मंजुरी देण्याचा निर्णय मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घेतला आहे. विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी २ विषय शिक्षकांची पदे मंजूर करण्याचाही निर्णय झाला आहे. मंत्री अतुल सावे यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना या संदर्भात आश्वासन दिले होते. कला, वाणिज्य किंवा कला, विज्ञान अशा दोन विद्या शाखा असलेल्या आश्रमाशाळांसाठी एकूण ८ शिक्षक मिळणार आहेत.
अशी होणार आश्रमाशाळांसाठी भरती
उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या (कनिष्ठ महाविद्यालय) विज्ञान शाखेसाठी वाढीव ०२ शिक्षकांची पदे मंजूर
ज्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत (कनिष्ठ महाविद्यालयात) कला/वाणिज्य आणि विज्ञान अशा दोन विद्याशाखा आहेत, त्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत एकूण ८ शिक्षकांची पदे अनुज्ञेय होतील.
मंजूर पदे सहा आणि अधिक नव्याने गणित/ विज्ञान विषयासाठी मंजूर होणारी दोन पदे असतील
त्यापैकी कला/ वाणिज्य विशेष विषय शिक्षकांची दोन आणि मराठी आणि इंग्रजी विषय शिक्षकाची दोन पदे
याशिवाय उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या विज्ञान शाखेस गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विशेष विषयांकरीता प्रत्येकी ०१ याप्रमाणे एकूण ०४ विषय शिक्षक अनुज्ञेय राहतील.