पुणे, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यात मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर पार्किंगची जागाच नसल्याने प्रवाशांच्या संख्येवर त्याचा परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पीएमआरडीएच्या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच प्रत्येक स्थानकाच्या परिसरात पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ही माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. या मेट्रो प्रकल्पाचा आढावा तसेच या कामातील समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. हा मेट्रो मार्ग मार्च २०२५ पासून पुणेकरांच्या सेवेत सुरू करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.