मुंबई, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात १६८ कोरोना सक्रीय रुग्ण आहेत. मागील चोवीस तासांमध्ये राज्यातील कोरोना सक्रीय रुग्णांमध्ये पंधराने वाढ झाली आहे. देशात ४१७० कोरोना सक्रीय रुग्ण आहेत. मागील चोवीस तासांमध्ये देशातील कोरोना सक्रीय रुग्णांमध्ये ११६ने वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोना सक्रीय रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये ३०९६ कोरोना सक्रीय रुग्ण आहेत. मागील चोवीस तासांमध्ये केरळमधील कोरोना सक्रीय रुग्णांमध्ये ३२ ने घट झाली आहे.
आतापर्यंत देशात २ अब्ज २० कोटी ६७ लाख ७९ हजार ८१ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस देण्यात आले आहेत. भारतात नव्याने कोरोना रुग्ण आढळत असले तरी हे रुग्ण वेळेत उपचार घेतल्यास बरे होतील अशा स्वरुपाचे आहेत. यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे, तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेणे आणि वैयक्तिक स्वच्छता, हातपाय धुणे याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनासाठी ६३ हजार विलगीकरण खाटा, ३३ हजार ऑक्सिजन खाटा, ९५०० अतिदक्षता खाटा, सहा हजार कृत्रिम श्वसन यंत्रणेशी संलग्न असलेल्या खाटा अशी व्यवस्था सज्ज आहे. शासन यंत्रणा एकजुटीने कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे. यंत्रसामुग्री, औषध साठा, इतर साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने घाबरु नये. काळजी घ्यावी काळजी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.