अयोध्या, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अयोध्येत प्रभू रामाच्या मंदिराचे २२ जानेवारी २०२४ रोजी उद्घाटन होणार आहे. या मंदिराच्या तळमजल्यावरील चौदा दरवाजांना सोन्याचा मुलामा दिला जाणार आहे. विदर्भातून आणलेल्या सागवान लाकडापासून हे दरवाजे तयार करण्यात आले आहेत. या दरवाजांना तांब्याचा लेप लावण्यात आला आहे. आता दरवाजांवर सोन्याचा मुलामा लावला जाणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हैदराबाद येथील कंपनीने दरवाजे तयार केले आहेत. या दरवाजांवर उत्तम अशी कलाकुसर करण्यात आली आहे. दरवाजांना सजविण्याचे काम कन्याकुमारी येथील कलाकारांनी केले आहे. दरवाजांवर भव्यतेचे प्रतीक गज अर्थात हत्ती, विष्णू कमळ, स्वागताच्या मुद्रेतील देवीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. प्रत्येक दरवाजावरील कलाकुसर ही इतर दरवाजांपेक्षा वेगळी आहे. गाभाऱ्याच्या दरवाजाची उंची आठ फूट आणि रुंदी बारा फूट आहे. इतर दरवाजांची उंची आठ फूट आणि रुंदी ही बारा फुटांपेक्षा कमी आहे.