मुंबई, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : स्वमग्न अर्थात ऑटिस्टिक रुग्णांना सोमवार ११ डिसेंबर २०२३ पासून बेस्टच्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येईल. बेस्ट बसमधून दिव्यांग प्रवासी, ज्येष्ठ नागरीक आणि महिला प्रवाशांसाठी यापूर्वीच आसने राखीव ठेवण्यात आली आहेत. गर्भवती आणि तान्ह्या बाळासह प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना बसमध्ये पुढील दरवाजाने प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय ४० टक्के आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येते. आता स्वमग्न अर्थात ऑटिस्टिक रुग्णांनाही बेस्टच्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येईल.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी स्वमग्न व्यक्तींनी संबंधित वैद्यकीय शासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या आजारपणाबाबत प्रमाणपत्र उपलब्ध करणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्राच्या साहाय्याने बेस्ट उपक्रमाच्या बस आगारातून या व्यक्तींना त्यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या स्मार्टकार्डवर आधारित बसपास अथवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या बस पासची मुदत एक वर्ष राहील. एक वर्षानंतर नव्याने प्रमाणपत्र सादर केल्यावर बस पासचे नूतनीकरण करण्यात येईल.