इंदापूर, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : इंदापूर येथे झालेल्या ओबीसींच्या मेळाव्यात भुजबळ कडाडले. छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यानंतर त्यांनी जरांगेंची नक्कल केली. जरांगे तू डोक्याने दिव्यांग झाला आहेस. तुला हिंदीसुद्धा येत नाही, असे भुजबळ म्हणाले. आमचा मराठा समाजाला विरोध नाही पण झुंडशाहीला विरोध आहे. दादागिरीला दादागिरीनेच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी दिला.
मराठ्यांकडे २० टक्के तर ओबीसींकडे ८० टक्के मते आहेत. संपन्न असलेले हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे मराठे कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत का ? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. ‘पाहिजे तर बोला. नको तर नकोच म्हणा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्या म्हणजे एकही मराठा राहणार नाही. सगळे शांत बसले आहेत. कशासाठी तर निवडणुकीसाठी? मग या गोष्टींना आळा घालणार नाहीत का ?’, असा रोखठोक सवाल भुजबळांनी केला.
मराठ्यांना ओबीसीमधून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्या
मराठा समाजाला नाही पण त्यांच्या झुंडशाहीला विरोध
जरांगेसाठी कायदा नाही का ? त्याच्यावर कारवाई का होत नाही ?
आम्ही ओबीसी शूद्र, मग शूद्र होण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र का मागता ?
राग भुजबळांवर असू शकतो, पण तो ओबीसींवर काढू नका
दोन महिन्यांत दिल्या गेलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या