नागपूर, ७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण मदत राज्य सरकार करेल; असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच शेवकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत दिली जात असल्याचेही फडणवीस म्हणाले.
राज्यातील ४० तालुके केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळी घोषित केले आहेत. तसेच राज्यातील १२०० मंडल दुष्काळसदृश जाहीर करण्यात आले आहेत. जी मदत दुष्काळासाठी तीच दुष्काळसदृशला मिळणार आहे. मदत २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काळात सुद्धा दहा हजार कोटींची मदत देण्यात आली आहे; असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
नागपूर जिल्ह्यामध्ये २६ ते २८ नोव्हेंबर या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौदा तालुक्यातील तारसा निमखेडा या गावांना भेटी दिल्या. नागपूर जिल्ह्यामध्ये या पावसात जवळपास १२४ गावांना फटका बसला आहे ८५२ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. मौदा तालुक्यात रामटेक पारशिवणी तालुक्यातही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात धानासोबतच कापूस तूर संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.