मुंबई, ६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मलबार हिल जलाशयातील कप्पा क्रमांक दोनची अंतर्गत पाहणी गुरुवारी केली जाईल. या पाहणीसाठी जलाशयाचा कप्पा रिकामा करणे आवश्यक आहे. यामुळे मुंबई शहरातील पाच प्रभागात पाणीकपात केली जाणार आहे.
दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मलबार हिलमधील १३८ वर्षे जुन्या जलाशयाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. जलाशयाच्या दुरुस्तीबरोबरच जलाशयाची क्षमता १४७.७८ दशलक्ष लिटरवरून १९१ दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत ६९८ कोटी ५० लाख रुपये आहे. हे काम सात वर्षांत टप्प्याटप्याने केले जाणार असून ते २०२९पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे ३८९ झाडे, मलबार टेकडी परिसरातील रस्ते बाधित होणार आहेत. यामुळे काही पर्यावरणप्रेमींचा प्रकल्पाला विरोध आहे. पण मुंबईच्या भविष्यातील गरजा ओळखून प्रकल्पाची अंमलबजावणी आवश्यक असल्याची भूमिका मनपा प्रशासनाने घेतली आहे.
कफ परेड आणि आंबेडकर नगर येथे पाणीपुरवठा पूर्ण बंद
नरिमन पॉइंट आणि जी. डी. सोमाणी मार्ग येथे ५० टक्के पाणीकपात
मिलिट्री झोन येथे ३० टक्के पाणीकपात
उर्वरित अ अर्थात ए विभागात १० टक्के पाणीकपात
क अर्थात सी विभागात १० टक्के पाणीकपात
पेडर रोड येथे २० टक्के पाणीकपात
उर्वरित ड अर्थात डी विभागात १० टक्के पाणीकपात
दादर पश्चिम, धारावी आणि माहीम परिसर, तसेच वरळी, लोअर परळ, प्रभादेवी, एल्फिन्स्टन यांचा पश्चिमेकडील काही परिसर येथे १० टक्के पाणीकपात