जळगाव, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मर्द मराठा मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार आहेत. या सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देऊ असे आधीच जाहीर केले आहे. यासाठीची आवश्यक ती कृती सुरू आहे. आता राज्यभरातील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांचा अभ्यास आहे अशा सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र यावं. मराठा समाजाचा फायदा कशात आहे… मराठा समाजाला जास्तीत जास्त टक्केवारी कशी मिळेल… याचा विचार करून भूमिका घ्यावी; असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कधीच काम केलं नाही, आणि विचार सुद्धा केला नाही, असे ते म्हणाले. मराठा आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात असताना महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झोपी गेले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचे जनक देवेंद्र फडणवीस आहेत. महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या चुकांमुळे आरक्षण गमावले. आता टिकणारे आरक्षण देण्यासाठी नव्याने प्रयत्न सुरू आहेत; असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.