सिंधुदुर्ग, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानच्या लष्करी कारवायांना चोख उत्तर देण्यासाठी भारताने ४ डिसेंबर १९७१ रोजी कराची बंदरावर हल्ला केला होता. या घटनेची आठवण म्हणून भारतीय नौदल दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौसेना दिन साजरा करते. यंदा भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार ४ डिसेंबर २०२३ रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. भारतीय नौदलाने हा टीझर ट्वीट केला आहे.
सिंधुदुर्गात नौसेना दिनाची जय्यत तयारी
यंदा भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार ४ डिसेंबर २०२३ रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ल्यावर जय्यत तयारी सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
भारतात सर्वात आधी आरमाराची अर्थात नौदलाची स्थापना शिवाजी महाराजांनी केली होती. या कामगिरीची आठवण म्हणून शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि राजकोट किल्ल्यावर नौदल दिन साजरा होणार आहे.
नौसेनेची प्रात्यक्षिके जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर होणार आहेत. नौदल दिनासाठी येणाऱ्या व्हीआयपींच्या सोयीसाठी सिंधुदुर्गात सात ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आली आहेत. चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नौसेना दिनानिमित्त मालवण मधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर भव्य व्यासपीठ बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा
येत्या ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये येत आहेत. यावेळी सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट आणि तारकर्ली येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री मालवणमधील कामकाजाचा तसेच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. राजकोट येथे शिवछत्रपतींचा ४३ फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. राजकोट किल्ला नौदलाकडे सुपूर्द करण्यात येईल.
सिंधुदुर्गात बाजारपेठ बंद
नौदल दिनानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी नेत्यांचे ताफे मालवण – देऊळवाडा – बोडींग ग्राउंड – राजकोट – तारकर्ली तसेच मालवण शहरातून जाणार आहेत. यावेळी आवठवडा बाजार भरला तर मोठ्या प्रमाणावर वाहनाची गर्दी होऊन ताफ्याला अडथळा निमार्ण होऊ शकतो. यासाठी पोलीस प्रशासनाने निर्बंध जारी केले असून १ डिसेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत हे निर्बंध बंधनकारक राहणार आहेत.