येवला, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. मंत्री छगन भुजबळ गुरुवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात विरोध पहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे.
‘आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका’, असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करुन द्या, मात्र, आमच्या बांधावर येण्याचा अट्टाहास का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासह सोमठानदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणाही देण्यात आल्या आहेत. भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत.
छगन भुजबळ यांना त्यांच्याच येवला मतदारसंघातुन विरोध होताना दिसत आहे. छगन भुजबळ गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दौऱ्याला विरोध करणारी एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ‘मला कोणी गावबंदी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही’ असं भुजबळ म्हणाले आहेत.
मंत्री छगन भुजबळ आज येवला आणि निफाड तालुक्यातील अवकाळीच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असणार आहेत. सकाळी ९ वाजता येवल्यातून करणार पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. तर भुजबळांच्या नुकसान पाहणी दौऱ्याला सकल मराठा समाजाचा मात्र विरोध दिसून येत आहे. रात्रीपासूनच येवला तालुक्यातील काही गावात भुजबळांना विरोध करण्यासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. मराठा बांधवांच्या विरोधामुळे येवल्यातील भुजबळांच्या संपर्क कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. संपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भुजबळांचा आजचा नुकसान पाहणी दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.