पुणे, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. पुण्यात घडलेल्या घटनेनंतर भुजबळांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे.
भुजबळ पुण्याच्या शासकीय विश्रामगृहात असताना तिथे घुसखोरी झाली. स्वराज्य संघटनेने ही घुसखोरी केली. ‘स्वराज्य’च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तुमची गाडी फोडू. गाडी फोडण्यासाठी वेळ लागणार नाही, असा इशारा दिला. स्वराज्य संघटनेने पोलिसांच्या उपस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांना धमकीवजा इशारा दिला.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या पण सरसकट कुणबी करू नका, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात या मुद्यावरून वाद सुरू आहे. दोन्ही बाजूचे समर्थक आक्रमक पवित्रा घेऊ लागले आहेत.