अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील पुण्यात कोठडीत आहे. त्याने पोटदुखी, हर्नियाचा त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. याआधीही येरवडा तुरुंगात असताना आजारी असल्याचे कारण देत ललित पाटील प्रदीर्घ काळ पुण्याच्या ससून रुग्णालयात होता. तो ससूनमध्ये असताना तिथून अंमली पदार्थांची तस्करी करत होता. काही काळानंतर तिथून तो एका हॉटेलमध्ये गेला आणि तिथून फरार झाला. मुंबई पोलिसांनी ललिलता परराज्यातून अटक करून पुन्हा महाराष्ट्रात आणले आणि पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या पुण्यात कोठडीत असलेल्या ललितने पुन्हा एकदा तब्येत बिघडल्याची तक्रार केली आहे. यावेळी ससून रुग्णालयाने ललितला दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. डॉक्टर नियमितपणे कोठडीत जाऊन ललितची तपासणी करून त्याच्यावर उपचार करत आहेत.