नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : माजी मंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने निर्दोष सोडल्याचा अर्थात क्लीन चिट दिल्याचा दावा त्यांची कन्या पूजा आणि सून राहत यांनी केला होता. या प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. सीबीआयने या प्रकरणात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात पूजा आणि राहत यांची नावे कट रचण्यातील साथीदार म्हणून समाविष्ट केली आहेत. या दोघींनी देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागा यांच्या प्रवासाची सोय केली. त्याद्वारेच डागा यांनी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देऊन त्यांच्याकडून या अहवालाचा मसुदा मिळवला, असे आरोपपत्रात म्हटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आधीच सीबीआयने अभिषेक तिवारी आणि आनंद डागा यांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र सादर केले. यानंतर सीबीआयने सोमवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये पूजा आणि राहत यांच्याखेरीज अनिल देशमुख यांचा दूरचा नातेवाईक विक्रम देशमुख आणि सत्यजीत वायाळ याचा समावेश आहे.