खेड, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: शेतकऱ्यांच्या शेतातील आणि व्यापाऱ्यांच्या गोदामातील सोयाबीन चोरी करून ऐश बाजीसाठी लाखो रुपये कमावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खेड पोलिसांना यश आले आहे. सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास काढून घेत अनेक शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत आर्थिक अडचणीत आणणाऱ्या अशा टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोयाबीन, पिक अप गाडी आणि चोरलेले पीक अप गाडीचे ३ नवे कोरे टायर असा ६ लाख,९९ हजार , ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .
चोरी करणारे सर्वजण एकमेकांचे मित्र आहेत.मौज मजेसाठी त्यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वजण अठरा ते २४ वयोगटातील असुन समीर आहेरकर, अविनाश राक्षे, ऋतिक तांबे, प्रफुल धंद्रे अशी आरोपींची नावे आहेत. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.