मुंबई, ११ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे विनाकारण तणाव निर्माण होत आहे. जरांगे पाटील यांचे उपोषण सुटल्यानंतर दोन दिवस गेले. यानंतर भुजबळ यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणारे वक्तव्य केले. यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाचे चित्र निर्माण होऊ लागल्याचा आरोप मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी केली आहे. भुजबळांसारखे जबाबदार मंत्री असे करणार असतील तर त्यांना मंत्रिपदावरून दूर करावे, अशी मागणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या जरांगे समर्थकांनी केली आहे. त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनातून भुजबळ यांना मंत्रिपदावरून दूर करावे, अशी मागणी जरांगे समर्थकांनी केली.