पुणे, १० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना झाले. प्रतापरावांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. मागील काही दिवसांपासून अजित पवार सार्वजनिक ठिकाणी दिसत नव्हते. डेंग्यू झाला असल्यामुळे उपचार घेत आहे, असे अजित पवारांकडून सांगण्यात आले होते. पण शुक्रवारी अजित पवार प्रतापरावांच्या घरी शरद पवारांना भेटले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. याआधी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे अर्थात भारत निवडणूक आयोगापुढे राष्ट्रवादी कुणाची या मुद्यावर सुनावणी झाली. सुनावणीच्यावेळी सुप्रिया गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. अजित पवारांच्या गटाने अर्थात दादा गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली दोन हजारपेक्षा जास्त प्रमाणपत्र बनावट आहेत, असा आरोप सिंघवी यांनी केला. निवडणूक आयोगाने सिंघवी यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि पुढील सुनावणी दिवाळीनंतर २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
शरद पवार – अजित पवार भेट
प्रतापराव पवारांच्या घरी झाली भेट
तासभर झाली चर्चा
चर्चेनंतर अजित पवार दिल्लीला रवाना