मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत आहे. डेंग्यू झाल्यामुळे डॉक्टरांनी अजित पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. तब्येतीत सुधारणा असली तरी आणखी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी अजित पवार यांना दिला आहे. अशक्तपणा आणि थकवा हा त्रास हळू हळू कमी होत आहे. काही दिवस गर्दी टाळावी तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावा असेही डॉक्टरांनी अजित पवार यांना सांगितले आहे. यामुळे यंदाच्या दिवाळीत अजित पवार कार्यकर्ते, पदाधिकारी यांना भेटणे टाळणार आहेत. जनसंपर्क काही दिवसांसाठी कमी केला असला तरी राज्यातील नागरिकांना तसेच पक्षाच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना अजित पवार यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.