पुणे, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अंमली पदार्थ प्रकरणी तस्कर ललित पाटील याला १३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ललितचे सहकारी असलेल्या शिवाजी शिंदे आणि रोहित चौधरी या दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शिवाजी शिंदे हा गुजरात आणि मुंबई येथून अंमली पदार्थ तयार करण्यासाठीचे रसायन आणत होता. ललित पाटील आणि इतर तेरा आरोपींना अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींची संयुक्त चौकशी करण्यासाठी वेळ हवा असे कारण देत पोलिसांनी अटक केलेल्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.
ललित अंमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात पुण्याच्या येरवडा तुरुंगात होता. तुरुंगात असताना ललित आजारी असल्याचे कारण देऊन ससून रुग्णालयात दाखल झाला. यानंतर तो वारंवार आजारी असल्याचे कारण देऊन ससूनमधील मुक्काम वाढवू लागला. ससूनमधून ललित अंमली पदार्थ तस्करी करत होता. काही आठवड्यांपूर्वी तो ससूनमधून एका हॉटेलमध्ये गेला आणि तिथून फरार झाला. मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकमधून अटक करून मुंबईत आणले. नंतर अंमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी ललितचा ताबा घेतला. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ललित पाटीलला १३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली.
महत्त्वाचे मुद्दे
ललित पाटील ड्रग्ज प्रकरण
ललितला १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
ललितसह दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी