पुणे, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पुणे पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ललित पाटीलला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली. या कालावधीत ड्रग्ज तस्करी प्रकरणी पुणे पोलीस ललितची कसून चौकशी करतील.
ड्रग्ज तस्कर ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला
मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला. पुणे पोलिसांनी ललितला बुधवारी न्यायालयात हजर केले आणि चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. याआधी ललित एका ड्रग तस्करीच्या प्रकरणात पुण्याच्या येरवडा तुरुंगात होता. तुरुंगात असताना ललित आजारी असल्याचे कारण देऊन ससून रुग्णालयात दाखल झाला. यानंतर तो वारंवार आजारी असल्याचे कारण देऊन ससूनमधील मुक्काम वाढवू लागला. ससूनमधून ललित ड्रग तस्करी करत होता. काही आठवड्यांपूर्वी तो ससूनमधून एका हॉटेलमध्ये गेला आणि तिथून फरार झाला. मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकमधून अटक करून मुंबईत आणले. आता ड्रग तस्करीच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी ललितचा ताबा घेतला आहे.