मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा आरक्षणप्रश्नी तयार केलेला शिफारशींचा अहवाल या बैठकीत स्वीकारला जाईल. याआधी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेले आंदोलन, कायदा – सुव्यवस्था, हिंसेला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने केलेले उपाय या विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात राजभवन येथे सुमारे अर्धा तास चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर रवाना झाले.