मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केंद्र आणि राज्य शासन काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा यामागे आहे. केवळ पायाभूत सुविधा, इमारती, मोठे प्रकल्प, भौतिक सुविधाच महत्वाच्या नाहीत, तर त्याचबरोबर आपली मातृभूमीविषयी प्रेम, संस्कृतीविषयी आदर तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळेच ‘माझी माती माझा देश अभियान’ हे देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ऑगस्ट क्रांती मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. ‘भारत छोडो’चा नारा येथून देशभर गेला. याच कारणामुळे ९ ऑगस्ट रोजी माझी माती माझा देश उपक्रमाची सुरुवात ऑगस्ट क्रांती मैदान येथून आपण केली. माझी माती माझा देश हा राष्ट्रभक्ती, देशभक्ती वाढीस लावणारा कार्यक्रम आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपण काम करीत आहोत. परकीय गुंतवणूक, पायाभूत सुविधा यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर झेप घेत असताना त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. आपले राज्य हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
गावागावातून एकत्र केलेली माती या अमृतकलशांच्या माध्यमातून आज मुंबई येथे आणण्यात आली आहे. या अमृत कलशांचे स्वागत करताना आनंद होत आहे. सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. अमृत कलश नवी दिल्लीत अमृत वाटीकेत नेली जाईल. देशभरातून आणलेली माती या ठिकाणी एकत्रित केली जाईल. खऱ्या अर्थाने एकात्मतेचं दर्शन येथे होईल. सांस्कृतिक कार्य विभागाने उत्तम नियोजन केले आहे. या विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे याबाबत निश्चितच कौतुक आहे. याशिवाय, नागरी क्षेत्रात मुंबई महापालिका आणि इतर नागरी संस्थांचा सहभागही तितकाच महत्वाचा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आपण शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्ष साजरे केले. लवकरच शिवकालीन वाघनखे आपण राज्यात आणत आहोत. संस्कृती, परंपरा जोपासण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.