मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रात विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात भाजपने मिशन ४५ प्लस हाती घेतले आहे. हे यश मिळवण्यासाठी निवडक जागांवर लोकप्रिय आमदारांना खासदारकीचे तिकीट देण्याबाबत विचार भाजपचे केंद्रीय नेते विचार करत आहेत.
अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पण महाराष्ट्रातील निवडक लोकसभा मतदारसंघांसाठी लोकप्रिय आमदारांच्या नावाचा विचार सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे लोकसभा मतदारसंघासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाचा विचार सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाही मुंबईतील एखाद्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजय केळकर किंवा रवींद्र चव्हाण यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.