जालना, ०४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: जालन्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. गृहमंत्री फडणवीस यांनी मराठा आंदोलकांची माफी मागितली. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील जालन्यातील घटनेचा निषेध व्यक्त करत मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,
जालन्यातील आंतरवली सराटी येथे पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यावरून विरोधी पक्ष राजकारण करत आहे. लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आल्याचं काही लोक सांगत आहे. परंतु जे लोक असं म्हणत आहे, त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करून दाखवावं. आरोप सिद्ध झाल्यास आम्ही त्यांच्या सगळ्या बाजू ऐकून घेऊ, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तसेच सध्या शांततेची आणि आंदोलन थांबण्याची गरज असल्याचं सांगत अजित पवारांनी मराठा संघटनांना संयमाने भूमिका घेण्याची विनंती केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की,
जालन्यातील आंतरवली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जचे आदेश एसपी आणि डीवायएसपी यांच्या पातळीवर देण्यात आले होते. त्यासाठी त्यांना कुणालाही विचारावं लागत नाही. ज्या निष्पाप लोकांना लाठीचार्जमुळं इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहे, त्यांची शासनाकडून क्षमा मागतो. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.