मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या विरोधकांच्या आघाडीची म्हणजेच ‘इंडिया’ची बैठक आज आणि उद्या मुंबईत पार पडत आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून देखील ‘महामंथन’ या दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीने बैठक आयोजित केल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु या बैठकीआधी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट केली.
‘यूपीए म्हणजे भ्रष्टाचार. अण्णा हजारेंनी तुमच्याविरोधात एवढे मोठे आंदोलन उभे केले. त्यामुळे देशातील सत्ता बदलली. एका आशेने मोदींना पंतप्रधान बनवले. भारताची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरु आहे. सर्वसामान्य माणूस सुखी झाल्यावर तुम्हाला लोकशाही आठवली. लोकशाही आहे म्हणून एवढ्या राज्यात तुमची सरकारे सत्तेवर आली. लोकशाही भारताचा आत्मा आहे. त्याचा वापर तुम्हाला भ्ष्टाचारी लोकांना करता येणार नाही. प्रत्येकाने विचार केला पाहिजे, यूपीएवरुन इंडिया हे नाव का केले? भारताच्या जनतेने तुम्हाला कधी स्वीकारलेले नाही. भारताची संस्कृती तुम्हाला मान्य नाही. काश्मीर भारताचा भाग आहे, त्यासाठी कलम ३७० हटवले. हे तुम्हाला मान्य आहे की नाही? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.
राजकारण विचारधारेवर चालत असते. एक टि्वट राहुल गांधी यांच्याबद्दल केले जाते. दुसरे टि्वट अरविंद केजरीवाल आणि तिसर टि्वट नितीश कुमार यांच्याबद्दल केले जाते. कालपर्यंत हीच लोकं महाराष्ट्राचा द्वेष करत होती, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली. महाराष्ट्रात काही घडले की, हेच लोक बाळासाहेबांविरुद्ध बोलत होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत केला. त्या बाळासाहेबांच्या मुंबईत जी लाचारी चालू आहे, ती आम्हाला मान्य नाही. एक वर्षापूर्वी सुद्धा मान्य नव्हती. आज बाळासाहेबांच्या विचारांवर महाराष्ट्राचे सरकार बनले. जे मुद्दे येतील, त्याला उत्तर द्यायला तिन्ही पक्ष समर्थ आहेत. सध्या जे सुरु आहे, ती लाचारी तुम्हाला मान्य आहे का? हा आमचा सवाल आहे, असे दीपक केसरकर म्हणाले.
आम्हाला कोणावर टीका करायची नाही. काँग्रेसने भष्टाचार केला, यूपीए नाव बदनाम झाले. म्हणून फक्त नाव बदलले आहे. आतली लोक तीच आहेत. भारताची प्रगती थांबली तरी चालेल, मोदीसारखा सक्षम नेता नको, अशी भूमिका घेऊन, कोणी काम करणार असेल, तर ते भारताला मान्य नाहीय. ९ वर्षापासून भारतातील, जगभरातील जनतेने प्रगती बघितली आहे, म्हणून चीनची गुंतवणूक थांबली असून ती गुंतवणूक आता भारतात येत आहे, असे दीपक केसरकर म्हणाले.