गांधीनगर २८ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी: सोमवारी गुजरातच्या राजधानीमध्ये पश्चिम भारतातल्या सगळ्या राज्यांची बैठक केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्दे मांडले.
कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी
नाफेडने कांदा खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले तसेच ही खरेदी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी अशी विनंतीही केली.
मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. हा मराठी अस्मितेचा प्रश्न असून याबाबतीत केंद्राने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असेही मुख्यमंत्री म्हणाले.
किनारी मार्गासाठी मागणी
राज्य शासन डहाणू ते सिंधुदुर्ग पर्यंत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोस्टल रोड(किनारी मार्ग) तयार करीत आहे. गोवा आणि गुजरात या राज्यांशी जर हा मार्ग जोडला गेला तर निश्चितच या राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढेल त्याचप्रमाणे सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीनेही फायदा होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सामंजस्य करारांची चांगली अंमलबजावणी
यावेळी प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात राज्य शासनाद्वारे चालविल्या जाणाऱ्या उपक्रम आणि कार्यक्रमांची माहितीही दिली. शासन आपल्या दारी सारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाद्वारे एकाच छताखाली आतापर्यंत दीड कोटींपेक्षा जास्त लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे असे ते म्हणाले.
आज महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीत देशातील आघाडीचे राज्य बनले आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधील सामंजस्य कराराची ७५ टक्के अंमलबजावणी देखील झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानहून महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी सकारात्मक चर्चा केली आहे अशी माहितीहि मुख्यमंत्र्यांनी दिली. नवीन बंदरे धोरण, माहिती तंत्रज्ञान धोरण, वस्त्रोद्योग धोरण आणि हरित हायड्रोजन धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आघाडीवर नेण्यात येत आहे. सीझेडएमपीची मान्यता मिळाल्यामुळे राज्यातील ५ किनारी जिल्ह्यांमध्ये पर्यटनाला चालना मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.