मुंबई, १३ जुलै २०२३, प्रतिनिधी : मी मंत्रिपदावर आजच दावा सोडणार होतो. पत्रकार परिषद घेऊन तसे जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. पण गेल्या अर्धा तासात मुख्यमंत्र्यांचे अनेक फोन आले. त्यांनी मला दावा न सोडण्याची विनंती केली. मला भेट. आपण चर्चा करू. त्यानंतर तू निर्णय घे, असं त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी फार आग्रह केल्यामुळे मी आज मंत्रिपद सोडण्याचा दावा मागे घेत असल्याचे म्हणत मी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदही घेणार नाही, असे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
इतनी शक्ती हमे देना दाता हे गाणं मी रात्री ऐकत होतो. त्यामुळे माझं मत परिवर्तन झालं आहे. आपण सामान्यांसाठी राहिलं पाहिजे. काही चुका आमच्या हातून झाल्या असेल तर त्या दुरुस्त केल्या पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. मला दिव्यांगासाठी वेळ द्यायचा आहे. मंत्रिपद घेतल्यावर मला काम करता येणार नाही. पद माझ्यासाठी क्षुल्लक आहे. मला पदाची लालसा नाही. मुख्यमंत्री पेचात आहेत. कुणाकुणाला पद देणार? त्यामुळे मी मंत्रिपदावरचा दावा सोडला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता हे बदलतं राजकारण आहे. त्याचा कंटाळा आलाय. लोक विचित्रपणे प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हे थांबलं पाहिजे. सर्व काही पदासाठी नसते. लोक म्हणतात, आता तुम्हाला पद मिळणार नाही. 50 खोके घेतले, असं म्हणतात. काही प्रामाणिकपणे प्रतिक्रिया देतात तर काही पैसे घेऊन कमेंट करत आहे, असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे हे मला महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेले होते. उद्धव ठाकरेंनी पाठिंबा द्या म्हणून सांगितलं होतं. आपलं सरकार बनतंय, आम्हाला पाठिंबा द्या, असं उद्धव ठाकरेंनी स्वत: फोन करून म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो. शिंदे सोबत होते. आम्ही पाठिंबा दिला. त्यानंतर विरोधकांकडून आम्हाला अमिषं आली, आम्हीही मंत्रिपदं देऊ, आमच्यासोबत या असं विरोधक म्हणाले. पण आम्ही पाठिंब्यावर ठाम राहिलो. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिले. त्यांनी राज्यमंत्रिपद दिलं.
दिव्यांग मंत्रिपद तयार करावी अशी मागणी मी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. पण ते खातं तयार झालं नाही. ते झालं असतं तर गुवाहाटिला जायची वेळ आली नसती. शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी दिव्यांग मंत्रीपद तयार केलं. माझ्या बंडामुळे आणि आंदोलानामुळे या सरकारने हे खाते तयार केले. त्यामुळे मी मुख्यमंत्री शिंदेंचा जन्मभर आभारी राहील. गरज पडल्यास मी त्यांचा व्यक्तिगत गुलामही बनेल. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.