मान्सून केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात दाखल झाला आहे. त्यानंतर आता पुढील ४८ तासांत म्हणजेच दोन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळं आता खरीप हंगामासाठी मशागतीच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं आता मान्सूनचं राज्यात आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. दुसरीकडे कोकण आणि मुंबईच्या किनारी भागांमध्ये पुढील २४ तासांत बिपरजॉय चक्रीवादळामुळं वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.’
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून केरळ आणि तामिळनाडूत दाखल झाला होता. अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळं यावर्षी मान्सून आठवड्याभराच्या उशीराने भारतात दाखल झाला आहे. त्यानंतर आता १३ ते १४ जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग दिला आहे. अनेकांनी कापूस, मक्यासह अन्य पिकांच्या तयारीसाठी शेतीची मशागत सुरू केली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गेल्या दोन दिवासांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं असंख्य शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. त्यानंतर आता येत्या दोन दिवसांत राज्यात मान्सून दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांत मान्सून दाखल होणार असलं तरी कोकणातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे. कारण पुढील २४ तासांत अरबी समुद्रात तयार झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ किनारी भागांमध्ये धडकणार आहे. रत्नागिरी आणि गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यांवर वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच आता मान्सून आणि चक्रीवादळ दोन्ही कोकणात एकाचवेळी दाखल होणार असल्याने किनारी भागांतील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे.