आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपविरोधात एक मजबूत आघाडी बनवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे येत्या ११ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. नितीश कुमार हे मुंबई दौऱ्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. तर ठाकरेंच्या भेटीनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
नितीश कुमार यांचा हा महाराष्ट्र दौरा विरोधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या बैठकीमध्ये ते उद्धव ठाकरे यांना देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी उभारण्यासाठीच्या विशेष बैठकीचे निमंत्रण देणार आहेत. १ वाजता मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेणार आहेत.
काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही त्यांनी भेट घेतली होती. सर्वांनी एकजुटीने भाजपा विरोधात लढावे अशी भूमिका नितीश कुमार यांची आहे. त्यामुळे आता तनितीश कुमार ११ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार असून काय भूमिका मांडरणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.