राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय आत्मकथा’ लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन पार पडले. या पुस्तकाच्या माध्यमातून शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. शरद पवारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवरच सवाल केला आहे.
लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात शरद पवार यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात पहिल्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यास शिवसेनेमध्ये वादळ माजेल याचा अंदाज आपल्याला नव्हता. हा उद्रेक शांत करण्यात शिवसेना नेतृत्व कमी पडले. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलताना असलेली सहजता उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधताना कधी जाणवली नाही. उद्धव ठाकरे यांची प्रकृती, त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा यामुळे त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती, असा खळबळजनक दावा शरद पवार यांनी आपल्या या पुस्तकात केला आहे.