सध्या मुंबईचा पारा ४० अंशाच्या पुढे गेलेला आहे. कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच पाणी कपातीमुळे मुंबईकर हैराण झाले होते; पण येत्या २३ तारखेपासून मुंबईची पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा आहे.
भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणार्या जलबोगद्यातून ठाणे येथे होणार्या गळतीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन मुंबईत ३० दिवस पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र अवघ्या १८ दिवसांमध्ये दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाला यश आले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात रद्द करून २३ एप्रिलपासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. भांडुप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणार्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या जलबोगद्यास ठाणे येथील कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. परिणामी, दुरुस्तीसाठी जलबोगदा ३१ मार्चपासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईत ३१ मार्चपासून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस १५ टक्के कपात जाहीर करण्यात आली होती.