ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज राज्य शासनाचा‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह धर्माधिकारी यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी असते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव केला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन महाराष्ट्र राज्याचा मान वाढला आहे. महासागरासमोर काय बोलावं कळत नाही. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही तर श्री परिवारातील सदस्य म्हणून बोलतोय. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी अमित शाह यांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
धर्माधिकारी कुटुंबियांनी कायमच भरकटलेल्या माणसांना मार्ग दाखवला आहे. ते एक दिपस्तंभ असून त्यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मी एवढंच सांगेन की, या लाखो कुटुंबात माझंही एक कुटुंब होतं. माझ्या कुटुंबावर जेव्हा दुखःचा डोंगर कोसळला, कुटुंब उद्धस्त झालं तेव्हा मला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यात आधार दिला आणि आप्पासाहेबानी माझ्या संपूर्ण कुटुंबाला या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन करायला दिशा दाखवली.