उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपसोबत गेलो नाही तर मला तुरुंगात टाकतील, असे एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडत म्हणाले होते असे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, आदित्य ठाकरे अजून लहान असून त्यांच्याकडे कुठे लक्ष देता, अश्या दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने आजचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर, कर्नाटक आणि बेळगावच्या विषयावर आम्ही वकिलांचे आणि तज्ञांची एक टीम तयार केली आहे. मोठे तज्ज्ञ वकील त्यात नेमण्याची सूचना दिलेली आहे. जे काय पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये तयारी करण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये स्वतः मी लक्ष घालत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यामध्ये एक नंबर विकास सुरु आहे. समृद्धी हायवेपासून मेट्रो काम सुरू आहे. बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. हे सर्व प्रकल्प वेगाने पूर्ण होत असून या सर्वांचा फायदा महाराष्ट्र आणि जनतेला पुढे होईल. तर, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.