कसबा विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीत लोकांचा आवाज यावेळी महाविकास आघाडीसोबत होता. महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले, याचा विजय हा परिणाम आहे. आगामी निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित येऊन सामोरे गेले आणि काम केले तर चांगला परिणाम दिसून येईल. महाराष्ट्रातही लोकांना बदल हवा आहे.
खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी एकत्रित आगामी निवडणूक लढल्यास लोकसभेला ४० तर विधानसभेला २०० जागा मिळतील, असे मत व्यक्त केले होते. याबाबत शरद पवार म्हणाले, संजय राऊत हे पत्रकार असून त्यांनी अभ्यास केला असेल. मात्र, याबाबत मला अधिक माहिती नाही. लोकांना आता बदल पाहिजे, असे राज्यातील दौऱ्यात मला दिसून येत आहे.
महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता आहे. जे त्यात सहभागी नाही त्याबाबत मी बोलणार नाही, असा टोला यावेळी शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना लगावला. ‘उद्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला एकत्र ठेवणे, एकत्रित निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काळजी घेणार आहे. लोकांना आता बदल हवा आहे. संजय राऊत हे पत्रकार आहे, त्या लोकांचा अभ्यास अधिक असतो, माझा इतका अभ्यास नाही. लोकांना आता बदल हवा आहे. लोकांच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे, असंही पवारांनी सांगितलं.
आता लगेच उपाययोजना केली जाणार नाही, महाविकास आघाडीच्या नेत्यांशी आम्ही बोलणार आहोत, काँग्रेस नेते, उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या सर्व घटकपक्षांसोबत चर्चा करणार आहोत.शरद पवार म्हणाले, खासदार राहुल गांधी हे देशातील एक राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आहे. देशातील लोकशाही संदर्भात चिंता करण्याबाबत त्यांनी परदेशात मत व्यक्त केले तर त्याबाबत आक्षेपार्ह काही नाही. महाविकास आघाडी मधील पक्ष आगामी काळात एकत्र राहण्याबाबत आम्ही विचार करत असून त्यात काँग्रेस असणे महत्वाचे आहे. देशातील गावागावात काँग्रेस विचार आणि कार्यकर्ता आहे. त्यांचे यश-अपयश सोडून द्यावे. पण, त्यांचे महत्व कमी नाही.