पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदल केलेला नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा अशी मागणी करत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली होती.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही विद्यार्थ्यांनी जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आंदोलनावर सुरुच राहणार असल्याचा पवित्रा घेतला होता. आता त्याचसंदर्भात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते. मात्र आजची ही भेट रद्द करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर यातून तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यात आली
दरम्यान, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेणार होते. मात्र आजची ही भेट रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने आजची भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.