राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली असून सर्व जागांचे निकाल लागले आहेत. तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना जवळपास ३० हजार मतांच्या अंतराने पराभव झाला आहे. एवढा मोठा विजय होऊनही सत्यजित तांबे विजयाचा जल्लोष करणार नाहीत. भावनिक कारणामुळे ते विजयाचा जल्लोष करणार नाहीत. तसं त्यांनी ट्विट करून सांगितलं.
सत्यजित तांबे यांचे सहकारी आणि नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांचं बुधवारी रात्री अपघाती निधन झालं. काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मित्राचं निधन झाल्याने सत्यजित तांबे अत्यंत व्यथित झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी विजयाचा कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.
सत्यजीत तांबे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होते. या पुर्वी त्यांचे वडिल सुधीर तांबे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांची मुदत संपत आली होती तर पुन्हा काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली होती आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. पण, सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून फॉर्म भरला नाही व सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. सत्यजीत तांबे यांना पहिल्या पसंतीची ६८९९९ इतकी मते मिळाली. तर शुभांगी पाटील यांना ३९५३४ मते पडली. पुन्हा एकदा नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे कुटुबियांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.