अांगणवाडीत दोन चिमुकल्यांना डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना भेंडवाडी येथे उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाळणाघरात चिमुकल्यांना होणाऱ्या मारहाणीची बातमी पुढे आली होती. त्यानंतर आता आंगणवाडीमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
काय घडलं नेमकं?
मुंजाजी सोनटक्के या पालकांने नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता 3 वर्षीय वेद ओमप्रकाश सोनटक्के आणि 4 वर्षीय समीक्षा मुंजाजी सोनटक्के या चिमुकल्यांना गावातील अंगणवाडीत सोडलं. मुलं आंगणवाडीतच होती. मात्र संध्याकाळी आंगणवाडीच्या सेविका आणि मदतनीस अंगणवाडी तशीच बंद करून निघून गेले. त्यांच्या दुर्लक्षपणामुळे दोन्ही चिमुकले अंगणवाडीतच अडकून पडले.
अंगणवाडीची वेळ संपली तरी मुले घरी परत न आल्याने पालकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्रं सर्वंत्र शोधूनही मुलं सापडलीच नाहीत. गावातील सर्वजण मुलांचा शोध घेत असल्याने, तेथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी अंगणवाडीत डोकावून पाहिलं. त्यावेळी दोन्ही मुलं अांगणवाडीतच आढळून आली. शाळेच्या शिक्षकांनी याची माहिती पालकांना दिली. संपूर्ण गाव तेथे जमा झाल्यानंतर दोन्ही मुलांना पहाटे 4.30 वाजता बाहेर काढण्यात आलं.
यावेळी ही दोन्ही मुलं बेशुद्ध अवस्थेत होते. या दोन्ही बालकांना तातडीने वसमत उपजिल्हा रुग्णालय येथे सकाळी दाखल करण्यात आलं. बालकांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आज सकाळी 10 वाजता त्यांना सुट्टी ही देण्यात आली.
मुंजाजी सोनटक्के यांच्या तक्रारीवरून संबंधी अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.